रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

तुंग वर पाहिलेला "स्वर्ग"....एक अनुभव


गडाचे नाव:  तुंग उर्फ कठीणगड
पायथ्याचे गाव: तुंगवाडी
तालुका: मावळ
जिल्हा: पुणे 
गडावर जाण्यासाठी लागणारा रोड(कात्रज वरून): कात्रज चौक->चांदणी चौक->पिरंगुट->पौड रोड -
>जवन-तुंगवाडी रोड->तुंगवाडी 
अंतर कात्रज वरून (कि.मी. मध्ये): ७०-७५ किमी
जाण्यासाठी लागलेला वेळ(कात्रज वरून): २:३० ते ३:०० तास 
गडावर पाहण्याची ठिकाणे: तुंगाई देवी मंदिर,गणेश मंदिर,हनुमान मंदिर,गणेश टाके,
सदर,श्री हनुमानाची दगडावर कोरलेली रेखीव मूर्ती 
तुंगवरून दिसणारे आजूबाजूचे गड: तिकोना,लोहगड,विसापूर 
जवळपास ची ठिकाणे: हाडशी टेम्पल,पवना धरण,तिकोना गड,कोरीगड


तुंग (कठीणगडाचा) आढावा

     ट्रेकिंग करण्याचा अनुभव फार काही मोठा नसला तरी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून फिरण्याची हौस मात्र प्रचंड आहे.त्यामुळे एखादा Weekend मिळाला कि तो घरी बसून खराब करण्यापेक्षा या गडकिल्ल्यांच्या सोबतीत घालवावा अस नेहमी वाटायचे.
    जुलै महिन्यातील अशाच एका रविवारी लोणावळ्या लगत असणारे तुंग (कठीणगड) आणि कोरीगड फिरून येऊ असे ठरवले.शनिवारी रात्रीं १० च्या सुमारास हा विचार डोक्यात आला होता.मग काय नेहमीच फिरण्यासाठी उत्सुक असणारे आमचे ठराविक मित्रमंडळ  यांच्याशी संपर्क साधला आणि रविवारी सकाळी ६:००  च्या सुमारास कात्रज(पुणे) वरून आपल्या या ट्रेकची सुरुवात करण्याचे ठरले.
     रविवारची सकाळ उजाडली,सोबतीला माझी लाडकी मैत्रीण म्हणजेच माझी बुलेट होतीच नेहमीच माझ्या  सोबत  राहणारी.. कधीही टांग न देणारी आणि दुसरीकडे होता एक आमचा मित्र ,जो पहाटे ५ वाजताच आजारी पडला(म्हणजे असा फोन केला त्याने(टांग दिली)).हुश्श्श....दोघेजण तर इथेच कमी झाले.राहिलो मी आणि संदीप. पन निर्धार तर केला होता त्यामुळे दोघांनीच ट्रेक सुरु करायचा असे ठरले.सुमारे ६:३० च्या सुमारास आम्ही कात्रज मधून तुंग च्या दिशेने जायला सुरुवात केली.

तुंग(कठीणगड) ला पोहोचण्यासाठी कात्रज वरून २ मार्ग आहेत
१) पिरंगुट-पौड रोड मार्गे
२)मुंबई-पुणे एक्सप्रेस - लोणावळा मार्गे

      आम्ही पिरंगुट-पौड रोड मार्गे जायचा निर्णय घेतला.पिरंगुट गाव सोडताच वरुणराजाची कृपादृष्टी आमच्यावर झाली.मधेच एका ठिकाणी सकाळचा चहा आणि नाश्ता उरकून घेतला आणि पुढच्या  प्रवासाला  सुरुवात केली.आजूबाजूला हिरवाईने नटलेला निसर्ग आणी अंगावर आभाळातून कधी संततधार तर कधी मुसळधार बरसणाऱ्या पावसाच्या सरी अनुभवत आमचा बाईक प्रवास पुढे सरकत होता.संदीप मागे बसून या प्रवासाचे फोटो व निसर्गसौन्दर्याचे काही क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपून घेत होता.जवन-तुंगवाडी  रोडवरून पुढे येत अंदाजे ९:३० च्या सुमारास आम्ही तुंग गडाच्या पायथ्याला पोहोचलो.आम्हाला कोरीगड ला हि जायचे असल्याने जास्त दिरंगाई न करता लगेचच आम्ही गड सर करायला सुरुवात केली.
      गडाच्या पायथ्याला तुम्हाला एक हनुमान मंदिर दिसेल.आम्ही आमची गाडी तिथे पार्क करून  पुढील पद्म्भ्रमंतीस सुरुवात केली.तुंग ला कठीणगड नावानेदेखील संबोधले जाते पण नावाप्रमाणे कठीण असा हा गड नाही.छोटासा टुमदार पण स्वराज्यातील एक महत्वाचा असा हा कठीणगड.आदिलशाहीच्या राजवटीखाली असलेल्या  ह्या  गिरीदुर्गाचे बांधकाम भोज राजाच्या काळातले असल्याचे सांगण्यात येते.इसवी सण १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी  हा गड जिंकून घेतला आणि त्याचे नाव कठीणगड असे ठेवण्यात आले.नैसर्गिक कोणाचा आकार,चोहोबाजूनी कातळकडे,तटबंदीसाठी दगडी चिरेबंदी बुरुज आणि आपल्या स्वतःच्याच तोऱ्यात एका पठारावर दिमाखात उभा राहिलेला तुंग आकर्षक दिसत होता. गडावर पोहोचण्यासाठी ३०-४० मिनिटांचा कालावधी लागतो.पावसाची रिपरिप नुकतीच थांबली होती.त्यामुळे हरिततृणांवर पडलेले पावसाचे टपोरे थेम्ब लक्ष वेधून घेत होते.आजूबाजूला असलेली नरकेळीची झाडे गडाचे सौंदर्य अजून खुलवत होती.गडाच्या वाटेतच एका बाजूला हनुमानाची दगडावर कोरलेली रेखीव मूर्ती आढळून येते.तिथून पुढे दगडी पायरीचा काही भाग सर करत आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो.मुख्य दरवाज्यातुन दिसणारे नयनरम्य दृश्य म्हणजे आपल्या सह्याद्रीला  लाभलेली नैसर्गिक देणगीच म्हणावी लागेल.
तुंग कडे जाण्याचा मार्ग 

     दरवाज्यातून पुढे जाताच गणपतीचे मंदिर  लागते.त्याच्या लागतच एक  पाण्याचे टाके आहे त्याला गणेश टाके म्हणतात.या ठिकाणाहून आपणास बालेकिल्ला पाहावयास मिळेल.श्री गणेशाचे  दर्शन घेऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे प्रस्थान केले.काही वेळातच आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो.बालेकिल्ल्यावर तुंगाई देवीचं एक मंदिर आहे.देवीचे दर्शन घेऊन आम्ही तेथे काही क्षणासाठी विसावलो आणि पुन्हा एकदा वरुणराजाची एन्ट्री झाली.पावसाचे गोल टपोरे बोचणारे ते थेम्ब आणि वाऱ्याची येणारी मंद झुळूक सोबतीला घेऊन गडावरून सभोवतालचा परिसर न्याहाळत होतो.


     खरच विलोभनीय असे दृश्य होते हे.दाटलेले बेधुंद धुके,मेघराजाची वाऱ्यासोबत होत असलेली चलबिचल आणि  मधूनच त्याच्या आडोशाला लपून बसलेला हिरवाईने नटलेला माझा सह्याद्री  जेव्हा अलगद डोकावून पाहायचा तेव्हा जणू स्वर्गदर्शन झाल्याचा अनुभव यायचा.माझ्या कल्पनेतल्या जगातला स्वर्ग जणू मी आज प्रत्यक्ष अनुभवत होतो.गडाच्या बाजूने अथांग पसरलेला पवना तलाव ,सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातून कोसळणारे धबधबे ,आजूबाजूची भातशेतीची रेखीव कलाकृती आणि खंबीरपणे उभा असलेली नरकेळीची झाडे असे हे बहारदार रूप डोळ्यांमध्ये जितके साठवता येईल तितके साठवून घेत होतो.यांच्याहून दुसरा असा काय तो आनंद...! काही क्षणांसाठी का असेना,पण साऱ्या जगाचा विसर पडून हे निसर्गाचे सौन्दर्य न्याहाळण्यातच धन्यता वाटत होती.तुंग वरून तुम्हाला तिकोना,लोहगड आणि विसापूर हे ३ दुर्ग देखील पाहावयास मिळतात.
गडावरून दिसनारा सभोवतालचा परिसर
                             
तुंगाई देवी मंदिर

    सभोवतालच्या परिसरावर धुक्याचे वर्चस्व जास्त असल्याने थोडेफार फोटोशूट करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.एव्हाना पावसाची रिपरीप हि थोडी कमी झाली होती.३०-३५ मिनिटांमध्ये आम्ही गड उतरून  दुपारी १२  च्या दरम्यान तुंग च्या पायथ्याला येऊन पोहोचलो.खरंच आजचा प्रवास सार्थकी लागल्याचा आनंद आम्हा दोघांच्या  हि चेहऱ्यावर झळकत होता.नजरेत कैद केलेले ते क्षण मनात गिरवत गिरवत आम्ही कोरीगडाच्या दिशेने रवाना झालो.

(क्रमशः)

फोटो गॅलरी :- (संदीप ने या आपल्या कॅमेरा मध्ये टिपलेली काही अप्रतिम छायाचित्रे)


      


श्री हनुमान यांची दगडावर कोरलेली मूर्ती



                                              
                               


पवना धरण आणि सभोवतालचा परिसर

बालेकिल्ला





२० टिप्पण्या:

  1. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार...आपण दिलेल्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिया खूप मौल्यवान आहेत..यापुढेही आपण अशीच साथ द्यावी एवढीच सदिच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. Coin Casino Review (2021) | CasinoWow
    Coin Casino is an online casino with games that 메리트카지노 are easy 온카지노 to access. With over 20 years of 인카지노 experience in the gaming industry, our team has made our reputation

    उत्तर द्याहटवा